रविवार, २५ जानेवारी, २०२६

अमूल्य मतदान करून दाखवूया..

सध्या देशभर लोकसभा निवडणुकांचा माहोल आहे.दोन टप्प्यातील मतदान नुकतेच पार पडले आहे. अजून दोन टप्पे बाकी आहेत. या दोन टप्प्यात  भारतीय म्हणवणाऱ्या प्रत्येकाने आणि ज्याला या देशाच्या लोकशाहीचा -संविधानाचा आदर आहे त्याने मतदान केले असेल अशी खात्री आहे. खरे तर लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होताच देशातील प्रस्थापित- सत्ताधारी, विरोधी पक्षांसहित या प्रत्येक पक्षाचे पदाधिकारी-कार्यकर्ते झटून कामाला लागतात.चर्चा-बैठका-सभा यांचा धुरळा उडवला जातो. दुसऱ्या पक्षातील तगडा उमेदवार स्वपक्षात आयात करण्याची खलबते आखली जातात.आयाराम-गयाराम स्पर्धा सुरु होते.तसेच निवडणुकीत उभा राहिलेला उमेदवार निवडून आणण्यासाठी तर समोरील तितकाच तुल्यबळ उमेदवार पाडण्यासाठी सेटिंग लावली जाते. प्रत्येक पक्षात उमेदवार जिंकण्यासाठी या ना त्या प्रकारे जीवाचा आटापिटा केला जातो. परंतु  या सगळ्यांमध्ये निवडणुका जिंकून सत्तेपर्यंत पोहचण्यासाठी जो महत्वाची भूमिका बजावतो तो म्हणजे "मतदार राजा" हा होय. निवडणुकांच्या या धामधुमीत खऱ्या अर्थाने "मतदात्याचा" मान पहिला असतो. याला कारणदेखील तसेच आहे.
 आपल्या देशातील  संविधानाने वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या व्यक्तीला मतदान करण्याचे राष्ट्रीय कर्तव्य आणि अधिकार बहाल केलेला आहे.मात्र हा अधिकार सगळेच नागरिक निभावत नाहीत.त्यामुळे गेल्या काही वर्षात निवडणुकांमधील मतदानाची टक्केवारी घसरताना दिसते आहे. मतदानासाठी इथे सरकार हक्काची सार्वजनिक सुट्टी जाहीर करते.मात्र अनेक महाभाग हीच सुट्टी मतदानासाठी सत्कारणी न लावता ते चक्क पर्यटनाला जाऊन येतात. मतदानाची सुट्टी असे मतदार फिरण्यामध्ये घालवून देशातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीचा आणि संविधानाचा अपमानच करत असतात.एका मताला खूप किंमत असते.मात्र या महाभागांनी मतदानाप्रती  निष्क्रियता दाखवल्याने विभागातील नको असलेल्या उमेदवारास निवडून आणण्यास नकळत  हातभार लावला जातो. त्यामुळे मतदान न करणारे इथे गुन्हेगार ठरतात आणि अशा व्यक्तींना सर्व सरकारी योजना, सुख-सोयी या पासून वंचित ठेवायला हवे. आज सरकारी पातळीवर,विविध  समाजमाध्यमे, प्रसारमाध्यमांद्वारे तसेच स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने नागरिकांना  मतदान करण्यासाठी आवाहन करावे लागते.त्यामुळे या आवाहनास प्रतिसाद  देऊन सर्वांनी  मतदानासाठी घराबाहेर पडायला हवे. यावेळी कोणीही, कुठल्याही पक्षाच्या वा उमेदवाराच्या भूलथापांना ,दारू- पैसे- कपडे अशा प्रकारच्या आमिषांना फसता कामा नये. स्वतःच्या मनाप्रमाणे प्रामाणिक, सुशिक्षित,गुन्हेगारी-भ्रष्टाचारी वृत्ती नसलेल्या उमेदवारास आत्मविश्वासाने -निर्भयपणे मत देऊन आपले दायित्व पार पाडावे.
    वास्तविक पाच वर्षातून करावे लागणारे मतदान म्हणजे एक प्रकारचा राष्ट्रीय उत्सव असतो. तो सर्वांच्या सहभागाने उत्साहात साजरा व्हायला हवा. स्वतःच्या कुटुंबियांसह मतदान करून इतरांना    मतदान करण्यासाठी  आग्रह करायला हवा. अमूल्य असलेले मत प्रत्येकाने दर निवडणुकीत दिल्यास मतदानाची टक्केवारी वाढून  पर्यायाने लोकशाहीप्रधान राष्ट्र  बळकट होण्यास हातभार लागेल यात शंका नाही.

--पंकजकुमार ध्रु.पाटील, कांजुरमार्ग-मुंबई.



लेबल: