रविवार, २५ ऑगस्ट, २०१९

थरकाप उडवणारा महापूर प्रसंग

थरकाप उडवणारा महापूर प्रसंग

काहि दिवसांपूर्वी कोकणासह महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी विशेषत: कोल्हापूर, सांगली  इथे आलेल्या महापूराने थैमान घालून अक्षरश: होत्याचे नव्हते केले. जिवित व मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान करून हजारोंचे संसार उध्वस्त झाले आहेत. शासकीय मदत तसेच इतर दानशूर व्यक्ती- स्वयंसेवी संस्थांनी लावलेल्या हातभाराने हि शहरे लवकरच पुन्हा उभी राहतील हि अपेक्षा आहे. मात्र कोल्हापूर-सांगलीतला हा महापूर पाहून मला  जुलै १९८९ साली रायगड जिल्ह्यात आलेल्या अशाच जलप्रलयाची आठवण आली.तेव्हा रायगडमधील नागोठणा-जांभूळपाडा येथील अंबा नदीला महापूर आल्याने पाण्याचा मोठ्ठा लोंढा तयार होऊन त्याने जिल्ह्यातील अनेक तालुक्यांना कवेत घेतले होते. माझा पेण तालुक्यात असलेला घोडाबंदर गाव देखील तेव्हा पाण्याखाली गेला होता. तेव्हा मी पाचवी इयत्तेला असेन. वडील नोकरी निमित्त मुंबईत होते. त्यामुळे गावी मी माझे आजी-आजोबा, आई सोबत पाच सहा महिन्याची माझी बहिण, काका-काकू यांच्यासह राहत होतो. लहान असल्यामुळे तितकीशी जाण नव्हती, मात्र आपल्यासमोर काहितरी संकट आल्याची कल्पना आली.माझ्या गावामध्ये पूर..पूर अशी भयभीत होऊन ओरड सुरू झाली होती.गावातील माझ्या नातेवाईकांसह इतरांच्या घरात पाणी घुसू लागले होते. पुराच्या पाण्याच्या पातळी वाढत असल्याचे पाहून ज्यांच्याकडे होडी होती (भातशेती सोबत गावकरी जोडधंदा म्हणून मच्छिमारी करायचे) त्यांनी पुरात सापडलेल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवायला सुरूवात केली. सुदैवाची गोष्ट म्हणजे आमचे कुडाचे घर तेव्हा उंचावर असल्यामुळे घराच्या थोडे उंबरठ्याखाली म्हणजे शेवटच्या पायरीपर्यत पाणी लागले होते. यावेळी सुरक्षेचा पर्याय म्हणून आश्रयासाठी दोन चुलत आजी-आजोबांच्या कुटुंबांचा संसारसुध्दा त्यांच्या घरातून आमच्या घरी हलवला होता.काहि क्षणातच नजरेच्या टप्प्यात  चहुकडे  पाणीच पाणी दिसत होते.
     एव्हाना शासनापर्यत पेण तालुक्यातील अनेक गावे पुरामुळे बुडाल्याची खबर पोहचली होती.  त्यानुसार पुरग्रस्त गावांमध्ये हेलिकॉप्टरने बिस्किट पुडे, पावाची तसेच चपाती- भाजी ,रव्याची पाकिटे देण्यात येत होती. आजोबा तर काठीला लुंगी लावून त्याचा झेंड्याप्रमाणे वापर करत मदत मागताना दिसल्याचे मला अजूनही आठवतय.आमचे गाव खाडी किनारी असल्यामुळे समुद्राच्या भरतीचे आणि पुराचे पाणी गावात तुंबून राहून हाहाकार माजवण्याची दुहेरी भिती होती.मात्र सुदैवाने तीन चार दिवसांनी हा पूर ओसरला. या पुरात आमच्या गावासह आसपासच्या वाड्या- गावांमध्ये कुठली जिवित हानी झाली नसली तरी अनेकांची भांडी-कुंडी, महत्वाचे सामान डोळ्यासमोर वाहून गेले तर काहिंचे खराब झाले. महापूरासारख्या या कसोटीच्या क्षणी गावकरी भयभीत जरूर झाले होते, मात्र सर्वांनी मोठ्या धैर्याने, एकमेकांना आधार देऊन या संकटाचा सामना केला. आज इतक्या वर्षानंतरही गावातला हा महापूराचा प्रसंग मनात कायम कोरलेला आहे.


--पंकजकुमार पाटील, कांजुरमार्ग
(लतासुत)


बुधवार, ७ ऑगस्ट, २०१९

"मैत्री" अबाधित राहो...


"मैत्री" अबाधित राहो...

ऑगस्टच्या पहिल्या रविवारी "मैैैैत्री दिन" साजरा केला होतो. खरेतर इतर सण-उत्सवांपेक्षा मैत्रीचा दिवस हा आगळा-वेगळा असतो. माझ्या मते मैत्री दिन साजरा करायला हा दिवस केवळ निमित्तमात्र ठरतो. कारण वर्षाचे 365 दिवस नसले तरी त्यापैकी निम्मे दिवस तरी दोस्ती-मैत्र म्हणून आपण एकमेकांच्या संपर्कात असतो वा संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतो.
     मैत्री करण्याला वय,नात्याचे,स्थळ-काळाचे,गरिब-श्रीमंतीचे,जाती-धर्माचे बंधन मूळातच असू नये. कुणाची आई,वडिल, मुलगा, मुलगी, भाऊ- बहिण तसेच पत्नी -पतीसोबत चांगली मैत्री असू /होऊ शकते. आपली हि मैत्री कधी, कुणाशी कोणत्या वेळी होईल हे देखील आपण सांगू शकत नाही.
       शाळा-कॉलेजातील एखाद्या मित्राशी-मैत्रीणीशी जुळलेले संबंध आयुष्याच्या अंतापर्यत आणखीन घट्ट करून आपण ते निभावत असतो. हि मैत्री वरवरची नसते.एकमेकांंच्या सुखात-दुखात जमेल तसे सामील होताना एक दुस-याच्या कठीण काळात आधार देण्यासाठी, मदत करण्यासाठी एकमेकांमधील मैत्रीचे नातेच कामी येत असते. कोणत्याही प्रकारचा स्वार्थी हेतू वा गैरफायदा घेण्याचा विचार नसल्याने हि मैत्री अधिकाधिक फुलत-रूजत अन् वाढत असते. अनेकांनी मैत्रीमध्ये स्वार्थीपणाचा अनुभव घेतला असेल किंवा आला असेल.मात्र तो अनुभव कधी कधी तिथेच सोडून दिल्याने मैत्रीमध्ये खंड पडण्याची परिस्थिती शक्यतो उद्भवत नाही.

   मला वाटते मैत्रीचे रोपटे वाढण्यासाठी खतपाणी एकानेच घालून चालत नाही. वेळ मिळेल तशा गाठी भेटी, संवाद साधणे, फिरायला जाणे या गोष्टी मैत्रीरूपी वेल अधिक उंच जाण्यासाठी हातभार लावणा-या ठरतात.मात्र कधी कधी होते काय, मैत्री जपण्याचा प्रयत्न एकतर्फी होत असतो.समोरील मित्र/ मैत्रीणीकडून ती अपेक्षापूर्ती होत नाही.त्यामुळे ती मैत्री तुुुुटक तुटक  होऊन मैत्रीमधला ओलावा कुठेतरी हरवून जातो. काहि मित्र ज्यांना आपण जिवलग समजत असतो ते तर आपल्या आयुष्यातून काहिच कारण न सांगता, फक्त त्यांच्यापुरता विचार करून अलगद दुर होतात. यामागची कारणे काहिही असू शकतात. आपण त्यांच्याशी चुकीचे वागलो वा त्यांच्या सोयीनुसार वागलो नाही असा ग्रह कदाचित त्यांनी करून घेतलेला असू शकतो किंवा पद, पैसा, प्रतिष्ठा या गोष्टींबाबत ते सरस ठरल्याने आपण समजत असलेल्या मैत्रीमध्ये आपला पत्ता कट झालेला असतो. यापैकी कुठलेच कारण उघड न करता मैत्रीचा केलेला शेवट पाहून ते आपले खरेच मित्र होते की मैत्रीचा केवळ दिखावा होता हि शंका मनात डोकावून जाते.असो.
   वास्तविक एकमेकांचा स्वभाव,आवडी-निवडी व अन्य बाजू लक्षात घेेेेऊन मैत्र जुळत असते.असे असले तरी मैत्री तुटायला जशी काहि कारणे पुरेशी ठरतात, तशीच काहिच कारण न सांगता देखील मैत्री सबंध दृढ होत जातात.
    आजच्या युगात मैत्रीच्या व्याख्या बदललेल्या आहेत. आजकाळची एखाद्यासोबतची मैत्री स्वैर अन्  मोकळीढाकळी झालेली दिसून येते.ज्या काळात मुलींशी बोलायला, त्यांच्या पुढ्यात उभे राहायला शरम यायची, त्याच मुली हल्ली मैत्रीसाठी मुलांकडे हात मागतानाचे दिवस आले आहेत. नुसत्या सोशल मिडीयावर मैत्री दिनाच्या शुभेच्छा पसरवून हा दिवस लिमिटेड न ठेवता प्रत्यक्ष भेटून, गिफ्टची देवाण घेवाण करून, फिरायला जाऊन मौज मस्ती करत तो एंजॉय केला जातोय.एकीकडे  प्रत्यक्ष मैत्री बहरत ठेवतानाच, दुसरीकडे सोशल मिडीयाच्या व्दारे अनेक क्षेत्रातील मान्यवर, सेलिब्रेटी यांच्यासोबत आभासी मैत्री करण्याकडे तरूणाई च नव्हे तर इतरांचा देखील वाढता कल दिसून येतोय. त्या त्या क्षेत्रातील एखाद्या व्यक्तीचे योगदान, त्यांचा वावर, त्यांची मते या बाबी लक्षात घेऊन मैत्रीची जवळीक साधलेली असते. परंतु  दुरवरची अर्थात आभासी असणारी हि मैत्री प्रत्यक्षात अस्तित्वात येऊन ते मैत्र वृध्दिंगत होण्याचे भाग्य क्वचितदा किंवा काहिजणांनाच  लाभत असावे.
     एकंदरित काय कुणासोबतही मैत्रीचे बंध विणताना हात आखडता घेऊ नये. त्याचबरोबर अवास्तव अपेक्षा, स्वार्थीपणा डोक्यात ठेवून,  अटी घालून मैत्री करू नये.  सीमा नसणा-या मैत्रीच्या वर्तृळात नानाविध स्वभावाच्या मित्र मैत्रीणींना सामावून घ्यावे. अमूक जणाशी,  अमूक काळ,अमूक कारणासाठी अशी मर्यादित मैत्री न ठेवता अमर्यादित मैत्रीचा आनंद मनापासून उपभोगायला हवा...शेवटी मैत्रीचा अध्याय कधीच न संपणारा असतो नाही का..मित्रहो...

--पंकजकुमार पाटील ( पंक्या)
७ ऑगस्ट २०१९

शनिवार, २० एप्रिल, २०१९

धार्मिक सहलीचा आनंददायी अनुभव..

धार्मिक सहलीचा आनंददायी अनुभव..


      पेण- रायगड मधील विठाबाई स्वयंसहाय्यता महिला बचत गटाच्या वतीने श्री.क्षेत्र पंंढरपूर या ठिकाणी  वार्षिक सहलीचे आयोजन दि.26 ते 27 जानेवारी 2019 दरम्यान करण्यात आले होते.थंडी सोबतीला घेऊन, खेळीमेळीच्या वातावरणात, विनोद मस्करी करत सर्वाच्या प्रसन्न चेह-यांनी अगदी भल्या पहाटे सहलीस सुरूवात झाली.
     सर्वप्रथम श्री.क्षेत्र देहूला पोहचल्यावर नवशा गणपतीचे दर्शन घेऊन  जगद्गुरू संत श्री.तुकाराम महाराजांचे जन्मस्थळ(वाडा), नांदुरी वृक्षा शेजारील वैकुंठ गमन  स्थान व इतर देवतांच्या मंदिरा समोर वंदन केले.पवित्र इंद्रायणी नदीचे दर्शन घेऊन देवाच्या आळंदीकडे निघालो.संत ज्ञानोबा माऊलीचेे संजीवन समाधीस्थळ पाहण्यासाठी मोठी दर्शन रांग होती.मात्र माऊलीच्या ओढीने अन् दर्शन रांगेतील काहि वारकरी भक्त, श्रध्दाळू महिलांच्या अभंग गायनामुळे जवळपास दोन-अडीच तासाची दर्शनरांग सहजसाध्य होऊन माऊलींच्या समाधी स्थानापुढे विनम्र झालो.त्यानंतर अष्टविनायकांपैकी थेऊरच्या श्री.चिंतामणीच्या दर्शनासाठी गाडी रवाना झाली.ब-यापैकी गर्दीत व गणपती बाप्पाच्या जयघोषात,  वर कौलारू तसेच मंडपाच्या चारही बाजूला लाकडी महिरप असणारे हे अतिशय सुंदर मंदिर आहे. गाभा-यात प्रवेश करताच बुध्दीची देवता असलेल्या विलोभनीय श्री.चिंतामणीपुढे प्रसन्नभावे हात जोडले.
चहापाणी झाल्यावर गाडी श्री.क्षेत्र पंढरपूरकडे निघाली.गाडीमध्ये थोडी झोप, मध्येच जाग अशा अवस्थेत अगदी पहाटेच विठूरायाच्या नगरीत दाखल झालो. सर्वप्रथम चंद्रभागेच्या नदित डुबकी मारत पवित्र स्नानाचा आनंद घेऊन मन प्रफ्फुलित केले.त्यानंतर अगदी चार वाजताच पंढरीरायाच्या भेटीसाठी दर्शनरांगेत उभे राहिलो. जिथे वर्षानुवर्षे हजारो-लाखोंच्या संख्येने विठ्ठल भक्त वा-या-पावसाची तमा न बाळगता पायी वारी करत विठू माऊलीच्या  ओढीने पंढरपुरकडे आकर्षिले जातात, तिथे थोडा वेळ रांगेत उभे राहणे आम्हाला जमून गेले.हळू हळू पुढे सरकत असतानाच माऊलींची मूर्ती दृष्टीस पडली, अगदी चरणस्पर्शाचे भाग्य लाभल्याने आम्ही धन्य झालो. भक्तांच्या पाठीशी उभा असलेल्या पंढरी राजाचे नयन रम्य रूप डोळ्यात साठवून आम्ही बाहेर पडलो.रूक्मिणी मातेचे सुध्दा याच पध्दतीने दर्शन घेतले.तिथून संत श्री.कैकाडी महाराजांच्या मठाकडे आलो.या मठ-मंदिर परिसराच्या अंतरंगात शिरल्यावर याठिकाणची उत्कृष्ट स्थापत्यकला पाहून अचंबित झालो. सर्वच प्राचीन ऋषी मुनी, थोर सुधारक, क्रांतीकारक, सुप्रसिध्द व्यक्ती, रामायण-महाभारत, पुराणकाळातील अनेक प्रसंग, सर्व जाती- धर्माच्या देवी देवतांच्या मूर्ती या जागेत उत्तमरित्या साकारल्या आहेत.या सर्व गोष्टी एका जागी बसवलेल्या पाहून खुप छान वाटले.
     तिथून अगदी वळणावळणाच्या रस्त्याने, उंचावर  असणा-याा शिखर शिंगणापूर या पवित्र तीर्थक्षेत्री पोहचलो.छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या पुढाकाराने बांधलेले व त्यांच्या खाजगी मालमत्तेचे असणारे हे मंदिर सुध्दा उत्कृष्ट स्थापत्यशैलीचा नमुना म्हणावा लागेल.संपूर्ण पाषाणी मंदिर, सुंदर कलाकुसर अन् वैविध्यपूर्ण असलेल्या उंच कळसामुळे हे मंदिर पाहताक्षणी प्रसन्न वाटते.गाभा-यातील शिवपींडीचे दर्शन घडताच मन सुखावून जाते.
त्यानंतर जेजुरी गडाकडे जात असताना परतणा-या भाविकांच्या अंंगास लागलेला भंडारा पाहून खंंडेरायास लवकर भेटण्याची ओढ लागते. गडाच्या पाय-या चढून गेल्यावर मंदिरासभोवती मल्हारी मार्तंड अर्थात खंडोबा देवावरती उधळलेला भंडारा पाहून "सोन्याच्या जेजुरीचा" प्रत्यक्ष अनुभव मिळतो.तिथल्या भव्य दगडी दिपमाळा आपल्याला ऐतिहासिक साक्ष देतात. यळकोट यळकोट जयमल्हारच्या जयघोषात मंदिरात पोहचल्यावर खंडेरायाच्या लोभस मुर्तीसमोर  आपसूकच हात जोडले जातात.
 अशा त-हेने नव्या वर्षाच्या सुरवातीलाच वरील सर्व तीर्थस्थाने भक्तिभावाने पाहून झाल्यानंतर सर्वानाच समाधान वाटले. हि धार्मिक सहल एक सुखद अनुभव आणि वर्षाभरासाठी नवी ऊर्जा देणारी ठरली.या सहलीचा अनुभव कथन करताना शेवटीचे सहलीचे आयोजक, तसेच आम्हा सर्वांचा प्रवास सुखरूप करणारे गाडीचे चालक, मालक व भुकेल्या पोटाची काळजी घेऊन जेवू-खाऊ घालणारे सहकारी यांचे मन:पुर्वक आभार व्यक्त करावेसे वाटतात.

-पंकजकुमार पाटील, मुंबई

लेबल:

अमूल्य मतदान करून दाखवूया..

सध्या देशभर लोकसभा निवडणुकांचा माहोल आहे.दोन टप्प्यातील मतदान नुकतेच पार पडले आहे. अजून दोन टप्पे बाकी आहेत. या दोन टप्प्यात  भारतीय म्हणवणाऱ्या प्रत्येकाने आणि ज्याला या देशाच्या लोकशाहीचा -संविधानाचा आदर आहे त्याने मतदान केले असेल अशी खात्री आहे. खरे तर लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होताच देशातील प्रस्थापित- सत्ताधारी, विरोधी पक्षांसहित या प्रत्येक पक्षाचे पदाधिकारी-कार्यकर्ते झटून कामाला लागतात.चर्चा-बैठका-सभा यांचा धुरळा उडवला जातो. दुसऱ्या पक्षातील तगडा उमेदवार स्वपक्षात आयात करण्याची खलबते आखली जातात.आयाराम-गयाराम स्पर्धा सुरु होते.तसेच निवडणुकीत उभा राहिलेला उमेदवार निवडून आणण्यासाठी तर समोरील तितकाच तुल्यबळ उमेदवार पाडण्यासाठी सेटिंग लावली जाते. प्रत्येक पक्षात उमेदवार जिंकण्यासाठी या ना त्या प्रकारे जीवाचा आटापिटा केला जातो. परंतु  या सगळ्यांमध्ये निवडणुका जिंकून सत्तेपर्यंत पोहचण्यासाठी जो महत्वाची भूमिका बजावतो तो म्हणजे "मतदार राजा" हा होय. निवडणुकांच्या या धामधुमीत खऱ्या अर्थाने "मतदात्याचा" मान पहिला असतो. याला कारणदेखील तसेच आहे.
 आपल्या देशातील  संविधानाने वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या व्यक्तीला मतदान करण्याचे राष्ट्रीय कर्तव्य आणि अधिकार बहाल केलेला आहे.मात्र हा अधिकार सगळेच नागरिक निभावत नाहीत.त्यामुळे गेल्या काही वर्षात निवडणुकांमधील मतदानाची टक्केवारी घसरताना दिसते आहे. मतदानासाठी इथे सरकार हक्काची सार्वजनिक सुट्टी जाहीर करते.मात्र अनेक महाभाग हीच सुट्टी मतदानासाठी सत्कारणी न लावता ते चक्क पर्यटनाला जाऊन येतात. मतदानाची सुट्टी असे मतदार फिरण्यामध्ये घालवून देशातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीचा आणि संविधानाचा अपमानच करत असतात.एका मताला खूप किंमत असते.मात्र या महाभागांनी मतदानाप्रती  निष्क्रियता दाखवल्याने विभागातील नको असलेल्या उमेदवारास निवडून आणण्यास नकळत  हातभार लावला जातो. त्यामुळे मतदान न करणारे इथे गुन्हेगार ठरतात आणि अशा व्यक्तींना सर्व सरकारी योजना, सुख-सोयी या पासून वंचित ठेवायला हवे. आज सरकारी पातळीवर,विविध  समाजमाध्यमे, प्रसारमाध्यमांद्वारे तसेच स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने नागरिकांना  मतदान करण्यासाठी आवाहन करावे लागते.त्यामुळे या आवाहनास प्रतिसाद  देऊन सर्वांनी  मतदानासाठी घराबाहेर पडायला हवे. यावेळी कोणीही, कुठल्याही पक्षाच्या वा उमेदवाराच्या भूलथापांना ,दारू- पैसे- कपडे अशा प्रकारच्या आमिषांना फसता कामा नये. स्वतःच्या मनाप्रमाणे प्रामाणिक, सुशिक्षित,गुन्हेगारी-भ्रष्टाचारी वृत्ती नसलेल्या उमेदवारास आत्मविश्वासाने -निर्भयपणे मत देऊन आपले दायित्व पार पाडावे.
    वास्तविक पाच वर्षातून करावे लागणारे मतदान म्हणजे एक प्रकारचा राष्ट्रीय उत्सव असतो. तो सर्वांच्या सहभागाने उत्साहात साजरा व्हायला हवा. स्वतःच्या कुटुंबियांसह मतदान करून इतरांना    मतदान करण्यासाठी  आग्रह करायला हवा. अमूल्य असलेले मत प्रत्येकाने दर निवडणुकीत दिल्यास मतदानाची टक्केवारी वाढून  पर्यायाने लोकशाहीप्रधान राष्ट्र  बळकट होण्यास हातभार लागेल यात शंका नाही.

--पंकजकुमार ध्रु.पाटील, कांजुरमार्ग-मुंबई.

लेबल:

शुक्रवार, १९ एप्रिल, २०१९

आठवणीतील "जत्रा"


चैत्र महिन्यात गुढी उभारून हिंदु-मराठी नववर्षाची सुरूवात होते.याच महिन्यापासून गावोगावच्या यात्रा किंवा जत्रा भरवल्या जातात. प्रत्येक ठिकाणच्या गावातील ग्रामदेवता तसेच एखाद्या स्वयंभू पुरातन देवाच्या नावे साजरा केल्या जाणा-या जत्रा वैशिष्टयपुर्ण ठरत असतात. जत्रेच्या  ठिकाणच्या अन् इतर आसपासच्या गावक-यांसाठी हि जत्रा म्हणजे आनंदाची-उत्साहाची पर्वणी असते.आमच्या रायगड जिल्हयातल्या पेण तालुक्यातील वढाव-वाशी या दोन गावांमध्ये चैत्र पौर्णिमेच्या आदल्या दिवशी अनुक्रमे बहिरीदेव आणि जगंदबा मातेची( वरसूआई) भरली जाणारी जत्रा न विसरता येण्यासारखी आहे. विशेष म्हणजे या जगदंबा मातेचे दर्शन महाराष्ट्राचे आराध्य दैवत, स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज त्याकाळी घेऊन गेल्याचा  इतिहास आहे. अगदी लहानपणापासून या जत्रेने काहि आठवणी आमच्या मनात कायम ठेवल्या आहेत.
        वर्षातून एकदाच येणा-या या जत्रेची तेव्हा वेगळीच ओढ असायची. जत्रा म्हणजे आई-वडिल, मामा,मावशी,आत्या अशा नातेवाईकांकडून पैसे (वाटणी) मिळणार आणि त्या पैशातून खाऊ, खेळणी घ्यायची आणि बाकी खुप मज्जा करायची हे डोक्यात असायचे. जत्रेच्या  दिवशी शर्ट-पॅंटचे खिसे चिल्लरने तर काहिंनी हात सैल करून दिलेल्या दोन-पाच रूपयांच्या नोटांनी फुगून गेल्याने आमच्या चेह-यावर "श्रीमंती"दिसायची.  देवीला बोललेले नवस फेडायला,तसेच दर्शन घ्यायला अनेक देवीभक्तांची-भाविकांची मंदिरात त्या दिवशी गर्दी झालेली असायची, त्यामुळे गर्दी कमी झाल्यावर देवीसमोर हात जोडून जत्रेत हुंदडायला मोकळे व्हायचो. एकीकडे देवळात दर्शनाची रांग लागलेली दिसायची तर दुसरीकडे देवाची पालखी निघायची. हि पालखी ठरलेल्या मार्गाव्दारे गावातील ठिकाणे घेत, गुलाल उधळीत,ढोल ताशांच्या आवाजात मोठ्या उत्साहाने -जल्लोषात नेली जात असे. पालखीच्या पुढे अनेक भोळे-भाबडे भाविक देव-देवतेच्या नावाने आपल्या अंगावर काटेरी निवडुंगाने फटके मारायचे.हे फटके मारून घेेेेताना भक्तांची संपूर्ण पाठ निवडुंगाच्या काट्यांनी भरली जाऊन रक्तबंबाळ व्हायची. हे असले दृश्य बघून आम्ही घाबरून जायचो.
          हि पालखी बघून झाल्यावर जत्रेतून फिरताना आम्ही आईकडे कधी फणसाचे गरे,कधी ताडगोळे- जांभूळ,करवंदे यासाठी हट्ट करायचो तर कधी भर उन्हा-तान्हात फिरल्याने तहान भागवण्यासाठी सरबत- लस्सी मागायचो. त्यानंतर मैदानात व रस्त्याच्या कडेला मांडलेली खेळण्याची दुकाने बघत बघत एखाद्या आवडलेल्या खेळण्यासाठी भोकांड पसरायचो. मग आई रंगीबेरंगी पिसांची टोपी,प्लॅस्टीकची गाडी, लाकडी तलवार, पिपाणी, पाण्याने भरलेला फूगा असे काहितरी घेऊन द्यायची. पण आम्हाला खरेतर 'खट-खट' असा आवाज येणारी 'खटारा गाडी'(ज्यापुढे आजच्या काळातील रिमोट गाडी फिकी वाटावी) खुप आवडायची. दुपारी आत्याच्या किंवा मावशीच्या घरी मटण-मच्छीचे जेवणावर  ताव मारून पुन्हा जत्रेच्या ठिकाणी पळायचो.त्यानंतर मग मामाच्या सोबतीने कधी पाळण्यात बसण्याची,  बंदुकीने फुगे फोडण्याची तर कधी  मौत का कुआ बघण्याची हौस भागवताना मस्त वाटायचे. खेळून दमल्यावर जत्रेमधील ठरलेल्या ठिकाणी ठिकठिकाणाहून मानाच्या देवकाठ्या आणल्या जायच्या. या काठ्या उभारताना बघण्यात वेगळीच मजा असायची. ज्याची काठी सर्वात उंच ठरेल तो विजेता ठरायचा.
       हळूहळू सुर्यास्त व्हायची वेळ यायची. जत्रेची सांगता मग खेळण्याची दुकाने पुन्हा पुन्हा न्याहाळत, मिठाईची खरेदी करून होत असे. लहान मोठी खेळणी विकत घेतल्याच्या आनंदासह दिवसभरातल्या जत्रेतील रूप डोळ्यात साठवून पावले घराकडे वळायची. आज कालानुरूप जत्रेत बदल घडत गेलेत. प्रत्येकाच्या आवडी-निवडी, हौसमौज करण्याच्या पध्दती बदलल्या गेल्यात. तरी देखील जत्रेतल्या  आठवणी मनात रेंगाळणा-या ठरतात.अशी हि माझ्या गावाकडची वेगळीच उर्जा-आनंद देणारी, पारंपरिकरित्या चालत आलेली जत्रा आपण एकदातरी अनुभवण्यास हरकत नाही.

--पंकजकुमार पाटील, पेण-रायगड


लेबल: