आठवणीतील "जत्रा"
चैत्र महिन्यात गुढी उभारून हिंदु-मराठी नववर्षाची सुरूवात होते.याच महिन्यापासून गावोगावच्या यात्रा किंवा जत्रा भरवल्या जातात. प्रत्येक ठिकाणच्या गावातील ग्रामदेवता तसेच एखाद्या स्वयंभू पुरातन देवाच्या नावे साजरा केल्या जाणा-या जत्रा वैशिष्टयपुर्ण ठरत असतात. जत्रेच्या ठिकाणच्या अन् इतर आसपासच्या गावक-यांसाठी हि जत्रा म्हणजे आनंदाची-उत्साहाची पर्वणी असते.आमच्या रायगड जिल्हयातल्या पेण तालुक्यातील वढाव-वाशी या दोन गावांमध्ये चैत्र पौर्णिमेच्या आदल्या दिवशी अनुक्रमे बहिरीदेव आणि जगंदबा मातेची( वरसूआई) भरली जाणारी जत्रा न विसरता येण्यासारखी आहे. विशेष म्हणजे या जगदंबा मातेचे दर्शन महाराष्ट्राचे आराध्य दैवत, स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज त्याकाळी घेऊन गेल्याचा इतिहास आहे. अगदी लहानपणापासून या जत्रेने काहि आठवणी आमच्या मनात कायम ठेवल्या आहेत.
वर्षातून एकदाच येणा-या या जत्रेची तेव्हा वेगळीच ओढ असायची. जत्रा म्हणजे आई-वडिल, मामा,मावशी,आत्या अशा नातेवाईकांकडून पैसे (वाटणी) मिळणार आणि त्या पैशातून खाऊ, खेळणी घ्यायची आणि बाकी खुप मज्जा करायची हे डोक्यात असायचे. जत्रेच्या दिवशी शर्ट-पॅंटचे खिसे चिल्लरने तर काहिंनी हात सैल करून दिलेल्या दोन-पाच रूपयांच्या नोटांनी फुगून गेल्याने आमच्या चेह-यावर "श्रीमंती"दिसायची. देवीला बोललेले नवस फेडायला,तसेच दर्शन घ्यायला अनेक देवीभक्तांची-भाविकांची मंदिरात त्या दिवशी गर्दी झालेली असायची, त्यामुळे गर्दी कमी झाल्यावर देवीसमोर हात जोडून जत्रेत हुंदडायला मोकळे व्हायचो. एकीकडे देवळात दर्शनाची रांग लागलेली दिसायची तर दुसरीकडे देवाची पालखी निघायची. हि पालखी ठरलेल्या मार्गाव्दारे गावातील ठिकाणे घेत, गुलाल उधळीत,ढोल ताशांच्या आवाजात मोठ्या उत्साहाने -जल्लोषात नेली जात असे. पालखीच्या पुढे अनेक भोळे-भाबडे भाविक देव-देवतेच्या नावाने आपल्या अंगावर काटेरी निवडुंगाने फटके मारायचे.हे फटके मारून घेेेेताना भक्तांची संपूर्ण पाठ निवडुंगाच्या काट्यांनी भरली जाऊन रक्तबंबाळ व्हायची. हे असले दृश्य बघून आम्ही घाबरून जायचो.
हि पालखी बघून झाल्यावर जत्रेतून फिरताना आम्ही आईकडे कधी फणसाचे गरे,कधी ताडगोळे- जांभूळ,करवंदे यासाठी हट्ट करायचो तर कधी भर उन्हा-तान्हात फिरल्याने तहान भागवण्यासाठी सरबत- लस्सी मागायचो. त्यानंतर मैदानात व रस्त्याच्या कडेला मांडलेली खेळण्याची दुकाने बघत बघत एखाद्या आवडलेल्या खेळण्यासाठी भोकांड पसरायचो. मग आई रंगीबेरंगी पिसांची टोपी,प्लॅस्टीकची गाडी, लाकडी तलवार, पिपाणी, पाण्याने भरलेला फूगा असे काहितरी घेऊन द्यायची. पण आम्हाला खरेतर 'खट-खट' असा आवाज येणारी 'खटारा गाडी'(ज्यापुढे आजच्या काळातील रिमोट गाडी फिकी वाटावी) खुप आवडायची. दुपारी आत्याच्या किंवा मावशीच्या घरी मटण-मच्छीचे जेवणावर ताव मारून पुन्हा जत्रेच्या ठिकाणी पळायचो.त्यानंतर मग मामाच्या सोबतीने कधी पाळण्यात बसण्याची, बंदुकीने फुगे फोडण्याची तर कधी मौत का कुआ बघण्याची हौस भागवताना मस्त वाटायचे. खेळून दमल्यावर जत्रेमधील ठरलेल्या ठिकाणी ठिकठिकाणाहून मानाच्या देवकाठ्या आणल्या जायच्या. या काठ्या उभारताना बघण्यात वेगळीच मजा असायची. ज्याची काठी सर्वात उंच ठरेल तो विजेता ठरायचा.
हळूहळू सुर्यास्त व्हायची वेळ यायची. जत्रेची सांगता मग खेळण्याची दुकाने पुन्हा पुन्हा न्याहाळत, मिठाईची खरेदी करून होत असे. लहान मोठी खेळणी विकत घेतल्याच्या आनंदासह दिवसभरातल्या जत्रेतील रूप डोळ्यात साठवून पावले घराकडे वळायची. आज कालानुरूप जत्रेत बदल घडत गेलेत. प्रत्येकाच्या आवडी-निवडी, हौसमौज करण्याच्या पध्दती बदलल्या गेल्यात. तरी देखील जत्रेतल्या आठवणी मनात रेंगाळणा-या ठरतात.अशी हि माझ्या गावाकडची वेगळीच उर्जा-आनंद देणारी, पारंपरिकरित्या चालत आलेली जत्रा आपण एकदातरी अनुभवण्यास हरकत नाही.
--पंकजकुमार पाटील, पेण-रायगड
लेबल: लेख





0 टिप्पण्या:
टिप्पणी पोस्ट करा
याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]
<< मुख्यपृष्ठ