रविवार, २५ ऑगस्ट, २०१९

थरकाप उडवणारा महापूर प्रसंग

थरकाप उडवणारा महापूर प्रसंग

काहि दिवसांपूर्वी कोकणासह महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी विशेषत: कोल्हापूर, सांगली  इथे आलेल्या महापूराने थैमान घालून अक्षरश: होत्याचे नव्हते केले. जिवित व मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान करून हजारोंचे संसार उध्वस्त झाले आहेत. शासकीय मदत तसेच इतर दानशूर व्यक्ती- स्वयंसेवी संस्थांनी लावलेल्या हातभाराने हि शहरे लवकरच पुन्हा उभी राहतील हि अपेक्षा आहे. मात्र कोल्हापूर-सांगलीतला हा महापूर पाहून मला  जुलै १९८९ साली रायगड जिल्ह्यात आलेल्या अशाच जलप्रलयाची आठवण आली.तेव्हा रायगडमधील नागोठणा-जांभूळपाडा येथील अंबा नदीला महापूर आल्याने पाण्याचा मोठ्ठा लोंढा तयार होऊन त्याने जिल्ह्यातील अनेक तालुक्यांना कवेत घेतले होते. माझा पेण तालुक्यात असलेला घोडाबंदर गाव देखील तेव्हा पाण्याखाली गेला होता. तेव्हा मी पाचवी इयत्तेला असेन. वडील नोकरी निमित्त मुंबईत होते. त्यामुळे गावी मी माझे आजी-आजोबा, आई सोबत पाच सहा महिन्याची माझी भाऊ- बहिण, काका-काकू यांच्यासह राहत होतो. लहान असल्यामुळे तितकीशी जाण नव्हती, मात्र आपल्यासमोर काहितरी संकट आल्याची कल्पना आली.माझ्या गावामध्ये पूर..पूर अशी भयभीत होऊन ओरड सुरू झाली होती.गावातील माझ्या नातेवाईकांसह इतरांच्या घरात पाणी घुसू लागले होते. पुराच्या पाण्याच्या पातळी वाढत असल्याचे पाहून ज्यांच्याकडे होडी होती (भातशेती सोबत गावकरी जोडधंदा म्हणून मच्छिमारी करायचे) त्यांनी पुरात सापडलेल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवायला सुरूवात केली. सुदैवाची गोष्ट म्हणजे आमचे कुडाचे घर तेव्हा उंचावर असल्यामुळे घराच्या थोडे उंबरठ्याखाली म्हणजे शेवटच्या पायरीपर्यत पाणी लागले होते. यावेळी सुरक्षेचा पर्याय म्हणून आश्रयासाठी दोन सख्खे चुलत आजी-आजोबांच्या कुटुंबांचा संसारसुध्दा त्यांच्या घरातून आमच्या घरी हलवला होता.काहि क्षणातच नजरेच्या टप्प्यात  चहुकडे  पाणीच पाणी दिसत होते.
     एव्हाना शासनापर्यत पेण तालुक्यातील अनेक गावे पुरामुळे बुडाल्याची खबर पोहचली होती.  त्यानुसार पुरग्रस्त गावांमध्ये हेलिकॉप्टरने बिस्किट पुडे, पावाची तसेच चपाती- भाजी ,रव्याची पाकिटे देण्यात येत होती. आजोबा तर काठीला लुंगी लावून त्याचा झेंड्याप्रमाणे वापर करत मदत मागताना दिसल्याचे मला अजूनही आठवतय.आमचे गाव खाडी किनारी असल्यामुळे समुद्राच्या भरतीचे आणि पुराचे पाणी गावात तुंबून राहून हाहाकार माजवण्याची दुहेरी भिती होती.मात्र सुदैवाने तीन चार दिवसांनी हा पूर हळू हळू ओसरला. या पुरात आमच्या गावासह आसपासच्या वाड्या- गावांमध्ये कुठली जिवित हानी झाली नसली तरी अनेकांची संसारोपयोगी सामान, भांडी-कुंडी,कपडे, महत्वाच्या वस्तू इत्यादी डोळ्यासमोर वाहून गेल्या तर काहिंच्या वस्तूंचे नुकसान झाले. महापूरासारख्या या कसोटीच्या क्षणी गावकरी भयभीत जरूर झाले होते, मात्र सर्वांनी मोठ्या धैर्याने, एकमेकांना आधार देऊन या संकटाचा सामना केला. आज इतक्या वर्षानंतरही गावातला हा महापूराचा प्रसंग माझ्या मनात कायम कोरलेला आहे.


--पंकजकुमार पाटील, कांजुरमार्ग
(लतासुत)


0 टिप्पण्या:

टिप्पणी पोस्ट करा

याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]

<< मुख्यपृष्ठ