शनिवार, २० एप्रिल, २०१९

धार्मिक सहलीचा आनंददायी अनुभव..

धार्मिक सहलीचा आनंददायी अनुभव..


      पेण- रायगड मधील विठाबाई स्वयंसहाय्यता महिला बचत गटाच्या वतीने श्री.क्षेत्र पंंढरपूर या ठिकाणी  वार्षिक सहलीचे आयोजन दि.26 ते 27 जानेवारी 2019 दरम्यान करण्यात आले होते.थंडी सोबतीला घेऊन, खेळीमेळीच्या वातावरणात, विनोद मस्करी करत सर्वाच्या प्रसन्न चेह-यांनी अगदी भल्या पहाटे सहलीस सुरूवात झाली.
     सर्वप्रथम श्री.क्षेत्र देहूला पोहचल्यावर नवशा गणपतीचे दर्शन घेऊन  जगद्गुरू संत श्री.तुकाराम महाराजांचे जन्मस्थळ(वाडा), नांदुरी वृक्षा शेजारील वैकुंठ गमन  स्थान व इतर देवतांच्या मंदिरा समोर वंदन केले.पवित्र इंद्रायणी नदीचे दर्शन घेऊन देवाच्या आळंदीकडे निघालो.संत ज्ञानोबा माऊलीचेे संजीवन समाधीस्थळ पाहण्यासाठी मोठी दर्शन रांग होती.मात्र माऊलीच्या ओढीने अन् दर्शन रांगेतील काहि वारकरी भक्त, श्रध्दाळू महिलांच्या अभंग गायनामुळे जवळपास दोन-अडीच तासाची दर्शनरांग सहजसाध्य होऊन माऊलींच्या समाधी स्थानापुढे विनम्र झालो.त्यानंतर अष्टविनायकांपैकी थेऊरच्या श्री.चिंतामणीच्या दर्शनासाठी गाडी रवाना झाली.ब-यापैकी गर्दीत व गणपती बाप्पाच्या जयघोषात,  वर कौलारू तसेच मंडपाच्या चारही बाजूला लाकडी महिरप असणारे हे अतिशय सुंदर मंदिर आहे. गाभा-यात प्रवेश करताच बुध्दीची देवता असलेल्या विलोभनीय श्री.चिंतामणीपुढे प्रसन्नभावे हात जोडले.
चहापाणी झाल्यावर गाडी श्री.क्षेत्र पंढरपूरकडे निघाली.गाडीमध्ये थोडी झोप, मध्येच जाग अशा अवस्थेत अगदी पहाटेच विठूरायाच्या नगरीत दाखल झालो. सर्वप्रथम चंद्रभागेच्या नदित डुबकी मारत पवित्र स्नानाचा आनंद घेऊन मन प्रफ्फुलित केले.त्यानंतर अगदी चार वाजताच पंढरीरायाच्या भेटीसाठी दर्शनरांगेत उभे राहिलो. जिथे वर्षानुवर्षे हजारो-लाखोंच्या संख्येने विठ्ठल भक्त वा-या-पावसाची तमा न बाळगता पायी वारी करत विठू माऊलीच्या  ओढीने पंढरपुरकडे आकर्षिले जातात, तिथे थोडा वेळ रांगेत उभे राहणे आम्हाला जमून गेले.हळू हळू पुढे सरकत असतानाच माऊलींची मूर्ती दृष्टीस पडली, अगदी चरणस्पर्शाचे भाग्य लाभल्याने आम्ही धन्य झालो. भक्तांच्या पाठीशी उभा असलेल्या पंढरी राजाचे नयन रम्य रूप डोळ्यात साठवून आम्ही बाहेर पडलो.रूक्मिणी मातेचे सुध्दा याच पध्दतीने दर्शन घेतले.तिथून संत श्री.कैकाडी महाराजांच्या मठाकडे आलो.या मठ-मंदिर परिसराच्या अंतरंगात शिरल्यावर याठिकाणची उत्कृष्ट स्थापत्यकला पाहून अचंबित झालो. सर्वच प्राचीन ऋषी मुनी, थोर सुधारक, क्रांतीकारक, सुप्रसिध्द व्यक्ती, रामायण-महाभारत, पुराणकाळातील अनेक प्रसंग, सर्व जाती- धर्माच्या देवी देवतांच्या मूर्ती या जागेत उत्तमरित्या साकारल्या आहेत.या सर्व गोष्टी एका जागी बसवलेल्या पाहून खुप छान वाटले.
     तिथून अगदी वळणावळणाच्या रस्त्याने, उंचावर  असणा-याा शिखर शिंगणापूर या पवित्र तीर्थक्षेत्री पोहचलो.छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या पुढाकाराने बांधलेले व त्यांच्या खाजगी मालमत्तेचे असणारे हे मंदिर सुध्दा उत्कृष्ट स्थापत्यशैलीचा नमुना म्हणावा लागेल.संपूर्ण पाषाणी मंदिर, सुंदर कलाकुसर अन् वैविध्यपूर्ण असलेल्या उंच कळसामुळे हे मंदिर पाहताक्षणी प्रसन्न वाटते.गाभा-यातील शिवपींडीचे दर्शन घडताच मन सुखावून जाते.
त्यानंतर जेजुरी गडाकडे जात असताना परतणा-या भाविकांच्या अंंगास लागलेला भंडारा पाहून खंंडेरायास लवकर भेटण्याची ओढ लागते. गडाच्या पाय-या चढून गेल्यावर मंदिरासभोवती मल्हारी मार्तंड अर्थात खंडोबा देवावरती उधळलेला भंडारा पाहून "सोन्याच्या जेजुरीचा" प्रत्यक्ष अनुभव मिळतो.तिथल्या भव्य दगडी दिपमाळा आपल्याला ऐतिहासिक साक्ष देतात. यळकोट यळकोट जयमल्हारच्या जयघोषात मंदिरात पोहचल्यावर खंडेरायाच्या लोभस मुर्तीसमोर  आपसूकच हात जोडले जातात.
 अशा त-हेने नव्या वर्षाच्या सुरवातीलाच वरील सर्व तीर्थस्थाने भक्तिभावाने पाहून झाल्यानंतर सर्वानाच समाधान वाटले. हि धार्मिक सहल एक सुखद अनुभव आणि वर्षाभरासाठी नवी ऊर्जा देणारी ठरली.या सहलीचा अनुभव कथन करताना शेवटीचे सहलीचे आयोजक, तसेच आम्हा सर्वांचा प्रवास सुखरूप करणारे गाडीचे चालक, मालक व भुकेल्या पोटाची काळजी घेऊन जेवू-खाऊ घालणारे सहकारी यांचे मन:पुर्वक आभार व्यक्त करावेसे वाटतात.

-पंकजकुमार पाटील, मुंबई

लेबल:

शुक्रवार, १९ एप्रिल, २०१९

आठवणीतील "जत्रा"


चैत्र महिन्यात गुढी उभारून हिंदु-मराठी नववर्षाची सुरूवात होते.याच महिन्यापासून गावोगावच्या यात्रा किंवा जत्रा भरवल्या जातात. प्रत्येक ठिकाणच्या गावातील ग्रामदेवता तसेच एखाद्या स्वयंभू पुरातन देवाच्या नावे साजरा केल्या जाणा-या जत्रा वैशिष्टयपुर्ण ठरत असतात. जत्रेच्या  ठिकाणच्या अन् इतर आसपासच्या गावक-यांसाठी हि जत्रा म्हणजे आनंदाची-उत्साहाची पर्वणी असते.आमच्या रायगड जिल्हयातल्या पेण तालुक्यातील वढाव-वाशी या दोन गावांमध्ये चैत्र पौर्णिमेच्या आदल्या दिवशी अनुक्रमे बहिरीदेव आणि जगंदबा मातेची( वरसूआई) भरली जाणारी जत्रा न विसरता येण्यासारखी आहे. विशेष म्हणजे या जगदंबा मातेचे दर्शन महाराष्ट्राचे आराध्य दैवत, स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज त्याकाळी घेऊन गेल्याचा  इतिहास आहे. अगदी लहानपणापासून या जत्रेने काहि आठवणी आमच्या मनात कायम ठेवल्या आहेत.
        वर्षातून एकदाच येणा-या या जत्रेची तेव्हा वेगळीच ओढ असायची. जत्रा म्हणजे आई-वडिल, मामा,मावशी,आत्या अशा नातेवाईकांकडून पैसे (वाटणी) मिळणार आणि त्या पैशातून खाऊ, खेळणी घ्यायची आणि बाकी खुप मज्जा करायची हे डोक्यात असायचे. जत्रेच्या  दिवशी शर्ट-पॅंटचे खिसे चिल्लरने तर काहिंनी हात सैल करून दिलेल्या दोन-पाच रूपयांच्या नोटांनी फुगून गेल्याने आमच्या चेह-यावर "श्रीमंती"दिसायची.  देवीला बोललेले नवस फेडायला,तसेच दर्शन घ्यायला अनेक देवीभक्तांची-भाविकांची मंदिरात त्या दिवशी गर्दी झालेली असायची, त्यामुळे गर्दी कमी झाल्यावर देवीसमोर हात जोडून जत्रेत हुंदडायला मोकळे व्हायचो. एकीकडे देवळात दर्शनाची रांग लागलेली दिसायची तर दुसरीकडे देवाची पालखी निघायची. हि पालखी ठरलेल्या मार्गाव्दारे गावातील ठिकाणे घेत, गुलाल उधळीत,ढोल ताशांच्या आवाजात मोठ्या उत्साहाने -जल्लोषात नेली जात असे. पालखीच्या पुढे अनेक भोळे-भाबडे भाविक देव-देवतेच्या नावाने आपल्या अंगावर काटेरी निवडुंगाने फटके मारायचे.हे फटके मारून घेेेेताना भक्तांची संपूर्ण पाठ निवडुंगाच्या काट्यांनी भरली जाऊन रक्तबंबाळ व्हायची. हे असले दृश्य बघून आम्ही घाबरून जायचो.
          हि पालखी बघून झाल्यावर जत्रेतून फिरताना आम्ही आईकडे कधी फणसाचे गरे,कधी ताडगोळे- जांभूळ,करवंदे यासाठी हट्ट करायचो तर कधी भर उन्हा-तान्हात फिरल्याने तहान भागवण्यासाठी सरबत- लस्सी मागायचो. त्यानंतर मैदानात व रस्त्याच्या कडेला मांडलेली खेळण्याची दुकाने बघत बघत एखाद्या आवडलेल्या खेळण्यासाठी भोकांड पसरायचो. मग आई रंगीबेरंगी पिसांची टोपी,प्लॅस्टीकची गाडी, लाकडी तलवार, पिपाणी, पाण्याने भरलेला फूगा असे काहितरी घेऊन द्यायची. पण आम्हाला खरेतर 'खट-खट' असा आवाज येणारी 'खटारा गाडी'(ज्यापुढे आजच्या काळातील रिमोट गाडी फिकी वाटावी) खुप आवडायची. दुपारी आत्याच्या किंवा मावशीच्या घरी मटण-मच्छीचे जेवणावर  ताव मारून पुन्हा जत्रेच्या ठिकाणी पळायचो.त्यानंतर मग मामाच्या सोबतीने कधी पाळण्यात बसण्याची,  बंदुकीने फुगे फोडण्याची तर कधी  मौत का कुआ बघण्याची हौस भागवताना मस्त वाटायचे. खेळून दमल्यावर जत्रेमधील ठरलेल्या ठिकाणी ठिकठिकाणाहून मानाच्या देवकाठ्या आणल्या जायच्या. या काठ्या उभारताना बघण्यात वेगळीच मजा असायची. ज्याची काठी सर्वात उंच ठरेल तो विजेता ठरायचा.
       हळूहळू सुर्यास्त व्हायची वेळ यायची. जत्रेची सांगता मग खेळण्याची दुकाने पुन्हा पुन्हा न्याहाळत, मिठाईची खरेदी करून होत असे. लहान मोठी खेळणी विकत घेतल्याच्या आनंदासह दिवसभरातल्या जत्रेतील रूप डोळ्यात साठवून पावले घराकडे वळायची. आज कालानुरूप जत्रेत बदल घडत गेलेत. प्रत्येकाच्या आवडी-निवडी, हौसमौज करण्याच्या पध्दती बदलल्या गेल्यात. तरी देखील जत्रेतल्या  आठवणी मनात रेंगाळणा-या ठरतात.अशी हि माझ्या गावाकडची वेगळीच उर्जा-आनंद देणारी, पारंपरिकरित्या चालत आलेली जत्रा आपण एकदातरी अनुभवण्यास हरकत नाही.

--पंकजकुमार पाटील, पेण-रायगड


लेबल: