धार्मिक सहलीचा आनंददायी अनुभव..
पेण- रायगड मधील विठाबाई स्वयंसहाय्यता महिला बचत गटाच्या वतीने श्री.क्षेत्र पंंढरपूर या ठिकाणी वार्षिक सहलीचे आयोजन दि.26 ते 27 जानेवारी 2019 दरम्यान करण्यात आले होते.थंडी सोबतीला घेऊन, खेळीमेळीच्या वातावरणात, विनोद मस्करी करत सर्वाच्या प्रसन्न चेह-यांनी अगदी भल्या पहाटे सहलीस सुरूवात झाली.
सर्वप्रथम श्री.क्षेत्र देहूला पोहचल्यावर नवशा गणपतीचे दर्शन घेऊन जगद्गुरू संत श्री.तुकाराम महाराजांचे जन्मस्थळ(वाडा), नांदुरी वृक्षा शेजारील वैकुंठ गमन स्थान व इतर देवतांच्या मंदिरा समोर वंदन केले.पवित्र इंद्रायणी नदीचे दर्शन घेऊन देवाच्या आळंदीकडे निघालो.संत ज्ञानोबा माऊलीचेे संजीवन समाधीस्थळ पाहण्यासाठी मोठी दर्शन रांग होती.मात्र माऊलीच्या ओढीने अन् दर्शन रांगेतील काहि वारकरी भक्त, श्रध्दाळू महिलांच्या अभंग गायनामुळे जवळपास दोन-अडीच तासाची दर्शनरांग सहजसाध्य होऊन माऊलींच्या समाधी स्थानापुढे विनम्र झालो.त्यानंतर अष्टविनायकांपैकी थेऊरच्या श्री.चिंतामणीच्या दर्शनासाठी गाडी रवाना झाली.ब-यापैकी गर्दीत व गणपती बाप्पाच्या जयघोषात, वर कौलारू तसेच मंडपाच्या चारही बाजूला लाकडी महिरप असणारे हे अतिशय सुंदर मंदिर आहे. गाभा-यात प्रवेश करताच बुध्दीची देवता असलेल्या विलोभनीय श्री.चिंतामणीपुढे प्रसन्नभावे हात जोडले.
चहापाणी झाल्यावर गाडी श्री.क्षेत्र पंढरपूरकडे निघाली.गाडीमध्ये थोडी झोप, मध्येच जाग अशा अवस्थेत अगदी पहाटेच विठूरायाच्या नगरीत दाखल झालो. सर्वप्रथम चंद्रभागेच्या नदित डुबकी मारत पवित्र स्नानाचा आनंद घेऊन मन प्रफ्फुलित केले.त्यानंतर अगदी चार वाजताच पंढरीरायाच्या भेटीसाठी दर्शनरांगेत उभे राहिलो. जिथे वर्षानुवर्षे हजारो-लाखोंच्या संख्येने विठ्ठल भक्त वा-या-पावसाची तमा न बाळगता पायी वारी करत विठू माऊलीच्या ओढीने पंढरपुरकडे आकर्षिले जातात, तिथे थोडा वेळ रांगेत उभे राहणे आम्हाला जमून गेले.हळू हळू पुढे सरकत असतानाच माऊलींची मूर्ती दृष्टीस पडली, अगदी चरणस्पर्शाचे भाग्य लाभल्याने आम्ही धन्य झालो. भक्तांच्या पाठीशी उभा असलेल्या पंढरी राजाचे नयन रम्य रूप डोळ्यात साठवून आम्ही बाहेर पडलो.रूक्मिणी मातेचे सुध्दा याच पध्दतीने दर्शन घेतले.तिथून संत श्री.कैकाडी महाराजांच्या मठाकडे आलो.या मठ-मंदिर परिसराच्या अंतरंगात शिरल्यावर याठिकाणची उत्कृष्ट स्थापत्यकला पाहून अचंबित झालो. सर्वच प्राचीन ऋषी मुनी, थोर सुधारक, क्रांतीकारक, सुप्रसिध्द व्यक्ती, रामायण-महाभारत, पुराणकाळातील अनेक प्रसंग, सर्व जाती- धर्माच्या देवी देवतांच्या मूर्ती या जागेत उत्तमरित्या साकारल्या आहेत.या सर्व गोष्टी एका जागी बसवलेल्या पाहून खुप छान वाटले.
तिथून अगदी वळणावळणाच्या रस्त्याने, उंचावर असणा-याा शिखर शिंगणापूर या पवित्र तीर्थक्षेत्री पोहचलो.छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या पुढाकाराने बांधलेले व त्यांच्या खाजगी मालमत्तेचे असणारे हे मंदिर सुध्दा उत्कृष्ट स्थापत्यशैलीचा नमुना म्हणावा लागेल.संपूर्ण पाषाणी मंदिर, सुंदर कलाकुसर अन् वैविध्यपूर्ण असलेल्या उंच कळसामुळे हे मंदिर पाहताक्षणी प्रसन्न वाटते.गाभा-यातील शिवपींडीचे दर्शन घडताच मन सुखावून जाते.
त्यानंतर जेजुरी गडाकडे जात असताना परतणा-या भाविकांच्या अंंगास लागलेला भंडारा पाहून खंंडेरायास लवकर भेटण्याची ओढ लागते. गडाच्या पाय-या चढून गेल्यावर मंदिरासभोवती मल्हारी मार्तंड अर्थात खंडोबा देवावरती उधळलेला भंडारा पाहून "सोन्याच्या जेजुरीचा" प्रत्यक्ष अनुभव मिळतो.तिथल्या भव्य दगडी दिपमाळा आपल्याला ऐतिहासिक साक्ष देतात. यळकोट यळकोट जयमल्हारच्या जयघोषात मंदिरात पोहचल्यावर खंडेरायाच्या लोभस मुर्तीसमोर आपसूकच हात जोडले जातात.
अशा त-हेने नव्या वर्षाच्या सुरवातीलाच वरील सर्व तीर्थस्थाने भक्तिभावाने पाहून झाल्यानंतर सर्वानाच समाधान वाटले. हि धार्मिक सहल एक सुखद अनुभव आणि वर्षाभरासाठी नवी ऊर्जा देणारी ठरली.या सहलीचा अनुभव कथन करताना शेवटीचे सहलीचे आयोजक, तसेच आम्हा सर्वांचा प्रवास सुखरूप करणारे गाडीचे चालक, मालक व भुकेल्या पोटाची काळजी घेऊन जेवू-खाऊ घालणारे सहकारी यांचे मन:पुर्वक आभार व्यक्त करावेसे वाटतात.
-पंकजकुमार पाटील, मुंबई
लेबल: लेख